नसरापूर – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वेळू फाटा येथे बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा वाहने एकमेकांवर आदळून चुराडा झाला. या अपघातात दोन जण गंभीर तर काही जण दोन किरकोळ जखमी झाले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातार्याच्या दिशेने वेगाने जाणारा एक मोठा ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या दुभाजकावर आदळला. अपघाताचा जोर इतका प्रचंड होता की दुभाजक तोडून ट्रेलर समोरून येणाऱ्या मार्गात घुसला आणि पिकअप, तीन दुचाकी व दोन कंटेनर अशा एकूण सहा वाहनांना जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला.
अपघाताचे ठिकाण Wom कंपनीच्या समोर असल्याने तेथील सुरक्षा रक्षक आणि कामगारांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. महामार्ग पोलिस , स्थानिक नागरिकही तातडीने घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमींना कंपनीच्या वाहनांतून त्वरित जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने ट्रेलर व इतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू केले.
सध्या दोन जखमींची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गाने वळवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.