इंदापूरः सचिन आरडे
राज्यातील पत्रकारांचे जीवन-मरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शनिवारी दि. १७ रोजी केली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या दीक्षाभूमी (नागपूर) ते मंत्रालय (मुंबई) पत्रकार संवाद यात्रा दुसऱ्या टप्प्यात दि. १९ रोजी बारामती येथे पोहोचली. तेथे आयोजित पत्रकार संवाद मेळाव्यात मुंडे बोलत होते. आमदार व माजी मंत्री दत्तात्रेय भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, पत्रकार संघाचे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष निळकंठ मोहिते, संघाचे जिल्हा सरचिटणीस सागर शिंदे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, बारामती तालुका अध्यक्ष संतोष जाधव व शेकडो पत्रकार या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले, ‘‘आपल्या अडचणी मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनी प्रगल्भ होऊन एकत्र आले पाहिजे. ‘पत्रकारांच्या प्रश्नांबाबत तुमचे उत्तर काय?’ असा जाब सरकारला ठासून विचारला पाहिजे. ’प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांसाठी स्वायत्त संस्था सरकारने स्थापन करावी. या संस्थेच्या माध्यमातून पत्रकारांना अधिकृत मान्यता देण्यात यावी.’’
पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे म्हणाले की, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचे काम पत्रकारांनी नेहमीच करावे, ही संघटनेची भूमिका आहे. राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद पत्रकारांचा मिळाला असल्याची माहिती आरोटे यांनी दिली.
यावेळी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, जिल्हाध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूरमध्ये प्रचंड सामाजिक काम उभे राहिले आहे. कोरोना कालावधीत १४ हजार गोरगरिबांना अन्नधान्य पुरवणारा
इंदापूरचा पत्रकार संघ आम्ही पाहिला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांनी पत्रकारांसंदर्भात केलेल्या मागण्या शासन दरबारी पोहचवू, अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक जिल्हा अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले तर आभार भीमराव आरडे यांनी मानले.