सातारा जिल्ह्यात शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानच्या महामार्गावरील प्रवास धोकादायक झाला आहे. तसेच शिरवळ ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा ‘विकएंड’ला खोळंबा होत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. शिरवळजवळील शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सेवा रस्त्याला वाहतूक वळविल्याने, तसेच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने नेहमीच येथे वाहतूक कोंडी होते. शिरवळ, केसुर्डी ते खंडाळ्यापर्यंत, तसेच खंबाटकी घाटातही जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकास मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे घाटातील दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्षः नागरिकांचा आरोप
महामार्गावर वेळे ते आनेवाडी दरम्यान अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असून, अनेक वेळा हे खड्डे बुजविले, तरीही पुन्हा तोंड वर काढतात. या खड्ड्यात वारंवार पडत असलेले डांबर, खडी उखडून रस्त्याच्या कडेला पसरले जाते. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळते. अशी खडी सुरूर, अनवडी, जोशीविहीर आदी ठिकाणी कायमस्वरूपी असते. मात्र, ती उचलणे आवश्यक असले, तरी महामार्ग प्राधिकरण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. साताऱ्याला जाताना व पुण्याकडे येताना टोलनाका परिसरात मोठे खड्डे असून, हे खड्डे जवळपास दोन फुटांचे आहेत. त्यामुळे वाहनांचे मोठे अपघात होत असून, दुचाकीस्वारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खड्ड्यांमुळे प्रवास बनतोय धोकादायक
महामार्ग सुरू असलेले रुंदीकरणाचे काम प्रवाशांच्या जिवावर बेतत आहे. जांबगाव येथे पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक सेवा रस्त्यावर वळवली आहे. या ठिकाणी खड्डे पडले आहे. अतित, माजगाव येथेही अशीच परिस्थिती आहे. रस्त्याची उंची समान न झाल्याने अनेक ठिकाणी दुचाकीचे अपघात होत आहे. उंब्रज ते पाचवड फाटा दरम्यानच्या महामार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. रस्ता धोकादायक असतानाही टोलची वसुली मात्र नियमितपणे सुरूच आहे. उंब्रज ते पाचवड फाटा या अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी सुमारे तास ते सव्वातास वेळ लागत आहे. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक वळविण्यात आले आहे. त्या वळविण्यात आलेल्या मार्गावरील अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्या मार्गावरचा ही प्रवास धोकादायक ठरू लागला आहे.