खंडाळा: धोम बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याच्या प्रवाहात साताऱ्यातील अजनुज (ता. खंडाळा) येथील बापलेक वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अजनुज येथील विक्रम पवार हे गोधडी धुण्यासाठी धोम बलकवडी कॅनॉलवर गेले होते.सोबत त्यांचा मुलगा शंभूराज पवार हा देखील गेला होता. वडील गोधडी धूत असताना छोटा शंभूराज पाण्यात उतरला. पाण्याचा प्रवाह गतिमान असल्याने तो वाहत गेला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या वडिलांनी पाण्यात धाव घेतली. मात्र पाण्याची गती अधिक असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले.
खंडाळा फलटण तालुक्यातील विविध गावांची पाण्याची मागणी असल्याने चारच दिवसांपूर्वी धोम बलकवडी धरणातून कालव्याला पाणी सोडले होते. कालव्याला पाणी आल्याने विक्रम पवार हे घरातील अंथरुणे घेऊन धुण्यासाठी गेले होते. मात्र दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही अचानक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ कालव्यावर पोहचले. सर्वांनी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला.
विशेषतः तरुणांनी दोरीच्या सहाय्याने पाण्यात उडी मारून दोघांना शोधण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर खंडाळा गावच्या हद्दीत महामार्ग लगत असणाऱ्या कालव्याच्या प्रवाहात मुलगा शंभूराज पवार (वय ५ वर्ष ) आढळून आला. त्याला तातडीने खंडाळा येथील मानसी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला. पण विक्रम पवार (वय ३४ वर्ष ) यांचा अद्याप शोध लागला नाही. ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमने शोधकार्य सुरुच ठेवले आहे.