भोरः तालुक्यातील एका गावात मद्यपान केलेल्या तीन जणांनी हार्डवेअरच्या दुकान मालकाकडे पैशांची मागणी केली. मालकाने पैसे देण्यास नकार दिला म्हणून चक्क दुकान मालकाची थेट कॅालर धरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी यामध्ये मालकाची पत्नीला देखील मारहाण झाली असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणी निता गोपाळ मसुरकर (वय 44) वर्षे यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संग्राम बाजीराव पवार, विकास म्हस्कु लिम्हण, तेजस रंगनाथ लिम्हण सर्व रा. पारवडी ता. भोर जि. पुणे यांच्यावर काद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
काल दिनांक २६ अॅाक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी यांचे पती गोपाळ एकनाथ मसुरकर दुकानात असताना वरील सर्व मद्य प्राशन करून दुकानात आले होते. यातील संग्राम पवार व विकास लिम्हण यांनी फिर्यादी यांचे पती गोपाळ मसुरकर यांच्याकडे २५ हजार रुपयांची मागणी केली.
ते सर्वजण दारू पिलेले असल्यामुळे त्यांना माझ्या पतीने “तुम्ही पैसे कशाचे मागता?” अशी विचारणा केली. तसेच “आम्ही दर महिन्याला तुझ्याकडे पैसे मागायला येवू, तू आम्हाला पैसे दिले पाहीजे”, असे म्हणून त्यांनी पतीची गंचुडी धरून मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केली. तसेच पतीच्या गळ्यातील चैन हिसकावून तुटलेली चैन त्यांच्या खिशात टाकली. फिर्यादी यामध्ये पडल्या असता त्यांना देखील मारहाण झाली. त्यांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली. यातील एकाने फिर्यादी यांना पेटवून देण्याची धमकी दिली असल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.
या घटनेत फिर्याद व त्यांचे पती जखमी झाले असून, त्यांनी एका खाजगी रुग्णालयात जावून औषधोउचार घेतलेले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.