परिंचेः युतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरूवात केली असून, तालुक्यातील अनेक गावांना ते भेट देत आहे. तालुक्यातील परिंचे येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेच्या माध्यमातून शिवतारे यांनी विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यावर टीकचे बाण डागले. २००९ आणि २०१४ या काळात या विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. त्या काळात राज्यात विरोधी पक्षाचे सरकार होते. तरी देखील मोठ्या प्रमाणावर मतदार संघातील विकास कामांसाठी निधी आणला. प्रशासकीय इमारत, जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालय, क्रीडा संकुल, शेकडो बंधारे मंजूर करवून घेतले. गेल्या अडीच वर्षे तर विद्यमान आमदार सत्तेत होते. याच काळात शेजारील असणाऱ्या इंदापूर, दौंड, भोर, आंबेगाव, जुन्नर अशा तालुक्यांना मोठ्या प्रमाणार निधी उपलब्ध करण्यात आला. मग पुरंदर आणि हवेलीसाठी हे का विद्यमान आमदारांना करता आले नाही, असा सवाल उपस्थित करीत शिवतारे यांनी संजय जगताप यांच्यावर टीकास्त्र डागले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप, मा. सभापती अर्चना जाधव, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, नगरसेवक सचिन भोंगळे, समीर जाधव, हरिभाऊ लोळे, पोपट खंगरे, श्रीकांत थेटे, सरपंच अर्चना राऊत, धनंजय यादव, नितीन यादव, हरिभाऊ पिलाणे यांच्यासह युतीमधील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठे संख्येने उपस्थित होते. जुलै २०२० मध्ये विद्यमान आमदारांनी गुंजवणी धरण योजनेची पाईपलाईनमध्ये बदल करून ती दुसऱ्या मार्गाने वळवली असल्याचा आरोप यावेळी बोलताना शिवतारे यांनी केला. परिंचे, राख, हरणी, वाल्हा या गावांना वंचित ठेवण्याचा त्यांचा डाव हाणून पाडला असे शिवतारे यावेळी म्हणाले.