भोर (प्रतिनिधी) –भोर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून नगराध्यक्ष पदावर कोणाची निवड होणार याबाबत अजूनही पेच कायम आहे. यंदा सर्वसाधारण आरक्षण लागू असल्याने दोन्ही प्रमुख पक्ष—भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)—यांच्यात सरळ संघर्ष दिसत आहे. काँग्रेस पक्ष मात्र माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर अस्तित्वाच्या संकटात सापडलेला दिसतो.
भाजपमध्ये नगराध्यक्ष पदासाठी गणेश पवार आणि संजय जगताप यांच्या नावात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आजी-माजी आमदारांच्या पाठिंब्यामुळे दोघांनाही संधी मिळू शकते, मात्र शहरातील वातावरण पाहता गणेश पवारांचे पारडे जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पवार घराणे हे भोरमधील जुने राजकीय घराणे. गणेश पवारांचे चुलते स्वर्गीय शंकरतात्या पवार यांनी दीर्घकाळ नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि गटनेते म्हणून काम केले असून त्यांचा विस्तृत जनसंपर्क आजही घराण्याला बळ देतो.
गणेश पवार यांनी मागील पंचवार्षिकात नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना प्रभागात तसेच शहरात रस्ते, पाणी, वीज, पाईपलाइन यांसारख्या मूलभूत सुविधांची कामे केली आहेत. तसेच शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंना आर्थिक मदत, उत्सव काळातील मंडळांना सहाय्य, दिवाळी फराळ वितरण, विद्यार्थ्यांच्या गुणवंत सत्कार सोहळे, आरोग्य शिबिरे अशा विविध उपक्रमांमुळे त्यांचा तरुणांमध्येही चांगला जनसंपर्क तयार झाला आहे. शहरातील तरुण मतदारांचा पवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद भाजपसाठी बलस्थान ठरत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या प्रवेशांमुळे पक्षाची ताकद शहरात वाढली आहे. राष्ट्रवादीकडून रामचंद्र आवारे हे संभाव्य उमेदवार मानले जात असून त्यांचा अनुभव, स्थानिक पातळीवरील कार्य आणि पक्ष संघटनातील पकड यामुळे राष्ट्रवादीही तितक्याच जोरात निवडणुकीला उतरू शकते.
सध्या भोरमध्ये ‘भाजपचे कमळ विरुद्ध राष्ट्रवादीचे घड्याळ’ अशी थेट लढत रंगेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शहरात गणेश पवार विरुद्ध रामचंद्र आवारे अशी प्रतिष्ठेची लढत होणार की काय, याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे. अंतिम उमेदवार घोषणेची शहरवासीयांना उत्सुकता लागली आहे.


















