भोर : भोर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला दिवसेंदिवस जोर येत असताना आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नसून ते केवळ खालच्या पातळीवर वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला. प्रभाग क्रमांक ९ मधील घरोघरी संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते.
भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जगताप यांच्यासह बजरंग शिंदे, जीवन कोंडे, संजय भेलके, रवींद्र कंक, चंद्रकांत सागळे, स्नेहा पवार, मनीषा भेलके, शांताराम पवार, विजय शिरवले, नंदा जाधव, आदिती भलके, अभिजित भेलके, कैलास ढवळे, धनंजय चव्हाण व मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रचार कार्यक्रमास उपस्थित होते. घरगुती भेटीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी बोलताना संग्राम थोपटे म्हणाले, “मागील तीन पंचवार्षिक काळात भोर नगरपालिकेत झालेल्या विकासकामांमुळे भाजपाची सत्ता एकहाती राहिली. आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढत आहोत; भोरमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, क्रीडा व पायाभूत सुविधा या अनेक क्षेत्रांत प्रगती झाली आहे. अनेक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत.”
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, “भोर शहरासाठी कोणते विकासात्मक नियोजन द्यायचे यावर न बोलता विरोधक वैयक्तिक टीका करण्यात व्यस्त आहेत. आमदार मांडेकर हे भोर नगरपालिकेच्या निवडणुकीपेक्षा विधानसभेच्या राजकारणात जास्त गुंतले आहेत. भोर शहराला काय हवे आहे, कोणत्या सुविधा आवश्यक आहेत यावर त्यांचे लक्ष नाही.”
भाजपाच्या दृष्टीने निवडणुकीतील वातावरण अति सकारात्मक असून, नागरिकांचा प्रतिसाद पाहता यावेळी २१-० असे विजयाचे लक्ष्य प्राप्त होईल, याबाबत कोणतीही शंका नाही, असा ठाम विश्वास थोपटे यांनी व्यक्त केला.
संग्राम थोपटे घरोघरी जाऊन मतदानदारांशी संवाद साधत असून गेल्या चार दिवसांत त्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भोरमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून दोन्ही पक्षांकडून विजयासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. मतदारांचा कल कोणाच्या बाजूने झुकतो हे आता मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.













