पुणे: सध्या एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका नवजात बाळ रडत असण्याचे दिसते. हा व्हिडिओ आहे पुण्यातील वडगाव बुद्रक परिसरातील रेणुका नगरीमधला. आईने आपल्याच पोटच्या बाळाला जन्म देऊन सोडून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्केतेमुळे कोवळ्या बाळाचा जीव वाचला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात बालकाच्या पालकांचा शोध देखील सिंहगड रोड पोलीस घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी सिंहगड पोलिसांना संपर्क केला. धक्कादायक बाब म्हणजे या नवजात शिशुचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून बाळाच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताची सिंहगड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले असून सध्या बालकाची प्रकृती स्थिर असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले आहे. अशा प्रकारे बाळाला सोडून पसार होणाऱ्या व्यक्तीबद्दल तीव्र संताप स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.