मत्स्य व्यवसाय नद्यांना लागलेले ग्रहण, नदीपात्रात खोलवर प्रकल्प उभारल्याने पिण्याचे पाणी दूषित होण्याची दाट शक्यता?
पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत भाटघर जलाशय
भोर : तालुक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर बसरापुर हे गाव वेळवंडी नदी किनारी वसलेले आहे. या गावाला वेळवंडी नदीवरील भाटघर धरणाचा निसर्गरम्य नदीकिनारा लाभला आहे . तालुक्यातुन जिल्ह्यातुन नव्हे तर राज्यातून या गावचा नदीकिनारा पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. या स्वच्छ आणि सुंदर नदी किनारी पर्यटक रमुन जात आहेत .भोर शहरासह, भाटघर,सांगवी,येवली, संगमनेर, माळवाडी मळे-भुतोंडे खो-यातील गावे, भोलावडे,किवत व वेळवंड खो-यातील गावे अशा अनेक गावांना या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.म्हणजेच हि गावे या नदीच्या, धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्तोत्र हे धरण आहे परंतु मागील चार पाच वर्षापासून या नदीच्या पात्रात बड्या वरदहस्तींचे छोटे मोठे मत्स्य व्यवसाय झाले आहेत.अलिकडील दोन दिवसांपूर्वी या नदी पात्रात दोन तीन मोठे प्रकल्प होणार असून याचे काम युद्ध पातळीवर मोठ्या प्रमाणात चालले आहेत. त्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची चर्चा या भागातील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. सदर प्रकल्प कोणत्या बड्या व्यावसायिकाचे आहेत हे मात्र अद्याप कळू शकले नाही. स्थानिक सरपंच,पोलीस पाटील यांनाही याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.स्थानिक सरपंच निलम झांजले व उपसरपंच रामदास झांजले यांनी हे प्रकल्प बंद होण्यासाठी आपल्या ग्रामस्थांसमवेत भोरचे तहसिलदार व जलसंपदा पाटबंधारे विभागाला याबाबत निवेदन दिले आहे.
देशी मासे संकटात
या मत्स्य व्यवसाय उद्योगात मोठ्या प्रमाणात चिलापी या माशाचे उत्पादन काढले .चिलापी हा मासा स्वस्त आहे.हा मासा मासांहारी प्रजातीचा मासा असुन हा मासा देशी,गावरान माशांचे बीज ,अंडी मोठ्या प्रमाणावर खातो.त्यामुळे देशी माशांची उत्पत्ती होत नाही. पुर्वी धरणातून रव , कटला, शिवडा, वाम ,मरळ ,कोळशी,कुरडी लोळी, मळवे, वांजी, लाल परी ,आंबळी, चालट अशा विविध देशी, गावरान प्रजांतीचे मासे मोठ्या प्रमाणावर मिळत होते.पंरतु आता असे विविध प्रकारचे मासे धरणातून न मिळण्याचे कारण चिलापी ,मांगुर अशा प्रकारचे मासे आहेत. हा मांसाहारी असल्याने इतर जातीचे मासे खातो.त्यांची अंडी तयार होऊ देत नाही.त्यामुळे देशी माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असुन देशी मासे संकटात सापडले आहेत. मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर याचा विपरीत परिणाम झाला आहे त्यांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
नदीत जागोजागी मच्छ व्यवसाय उभारल्याने वेळवंडी नदीचे अस्तित्व धोक्यात
भाटघर धरण भोर शहराला व तालुक्याला पाणीपुरवठा करणारे एकमेव मुख्य स्त्रोत असुन या धरणात व्यावसायिक पध्दतीने मत्स्य पालन होत आहे गेली ३ ते ४ वर्षे हा व्यवसाय लहान प्रमाणात चालु होता. नदी पात्रात छोटे छोटे माशांचे पिंजरे लावलेले होते परंतु आता मार्च महिन्यात काही मासेमारी बड्या व्यापा-यांनी भोर भाटघर जलाशयात रॉयल्टी भरून मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी पिंजरा (केज) या पध्दतीने मासे पालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. हे काम एवढे प्रचंड मोठे असून दिवस रात्र याचे काम युद्ध पातळी चालले आहे.या व्यवसायात हे मासे लवकर मोठे होण्यासाठी पाण्यात ज्या खाद्याचा वापर केला जातो ते खाद्य नैसर्गिक नसुन कुत्रिम पध्दतीने तयार केलेले असते ते माशांना पाण्यात टाकल्यावर पूर्णपणे पाण्यात न विरघळता पाण्यावर तरंगत रहाते त्यामुळे पाणीसाठा दुषित होत आहे. मासे मेल्यामुळे माशांचा वास पाण्याला येत राहतो व पिण्याचे पाणी दूषित होते दुषित झालेल्या पाण्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
शासन मत्स्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना या व्यवसायाची रीतसर परवानगी जरी देत असेल त्यातून हा व्यवसाय जरी मोठ्या उत्पादन , उत्पन्नाचा होत असला परंतु तरी नद्यांचे अस्तित्व मात्र या व्यवसायांमुळे धोक्यात येऊ लागली आहे. एकूणच मत्स्य व्यवसाय हे नद्यांना लागलेले ग्रहण असल्याचे रोज नदीकिनारी पोहण्यासाठी येणारे जलतरणपटू सागर जाधव ,निखिल बागडे, प्रमोद शेटे व योगेश गुठाळकर यांनी सांगितले.