भोर : भोर तालुक्यात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे आश्वासन लोकप्रिय आमदार श्री शंकरभाऊ मांडेकर यांनी दिले आहे. एकलव्य क्रीडा संस्थेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
एकलव्य क्रीडा संस्थेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आळंदे ता.भोर या ठिकाणी कबड्डी स्पर्धेच्या समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना भोर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे म्हणाले, तालुक्यात कबड्डी आसोसिएशनच्या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी सर्वतोपरी मदत केली जात असून, क्रीडा संकुल नसल्यामुळे अडचणी येत आहेत.
उपस्थितांना ग्वाही देत आ.शंकर मांडेकर म्हणाले भोर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भागाला रोजगार, पर्यटन याच बरोबर खेळाची देखील गरज असून या “भोर तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, यासाठी लवकरच भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येईल,”असे आश्वासन आमदार मांडेकर यांनी दिले.
पुढे ते म्हणाले एकलव्य क्रीडा संस्थेने आयोजित केलेली ही स्पर्धा तालुक्यातील युवकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. कबड्डी या पारंपरिक खेळाला नवसंजीवनी देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून प्रभावीपणे केले जात आहे.
या स्पर्धेसाठी आमदार शंकर मांडेकर, माजी सदस्य व भोर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत बाठे, भोलावडेचे सरपंच प्रवीण जगदाळे, भोर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष केतन चव्हाण, चेअरमन अंकुश चव्हाण, पांडुरंग बाठे, केंजळ गावचे सरपंच अजय बाठे, उपसरपंच किरण येवले, वागजवाडीचे सरपंच गणेश आवाळे, लहू साळुंखे, राजेंद्र बांदल व खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेत गजराज एंटरप्रायझेस संघाने प्रथम क्रमांक पटकावून विजय मिळवला, तर आझाद वॉरियर्स आणि हिंदवी वॉरियर्स यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये साहिल बरदाडे याला उत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळाला, आनंद बंडी याला उत्कृष्ट चढाईपट्टू, तर विशाल ढोणे याला उत्कृष्ट डिफेंडर म्हणून गौरविण्यात आले.