नसरापूर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे शनिवारी (दि. १९ जुलै) पुणे जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर कापूरहोळ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या पक्षनियुक्तीचा उत्सव कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.
प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर साताऱ्याकडे जाणारा माझा प्रवास एक वेगळाच अनुभव ठरला, असे आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले. “या प्रवासात पुण्यातून जात असताना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पुणेकर जनतेने मनःपूर्वक स्वागत व सन्मान केला. हा सन्मान केवळ माझा नसून, आपल्या सर्वांचा आहे – ज्यांनी पक्षाचे विचार निष्ठेने जपले, संघर्षात साथ दिली आणि संघटनेला बळकट केले. आपण दिलेला सन्मान आणि आशीर्वाद मला माझ्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी निश्चितच प्रेरणा देणारा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कापूरहोळ येथे भोर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळून आणि पुष्पहारांनी शिंदे यांचे स्वागत करताना दिसले. यावेळी रविंद्र बांदल, मानसिंगबाबा धुमाळ, संदीप नांगरे, विठ्ठल शिंदे, गणेश खुटवड, भरत बोबडे, माऊली कोंडे, शुभांगी जायकर , आनंद दळवी, पार्थ रावळ, गणेश बागल यांसह तालुका व स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे यांनी पुढे सांगितले की, “सन्मान सोहळ्यात पुणे ते शिरवळ परिसरातील ज्येष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते, महिला भगिनी, विविध विभागांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या डोळ्यांतील विश्वास, प्रेम आणि अपेक्षा मी स्पष्टपणे पाहिल्या. तोच विश्वास पुढे नेत, मी प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो.”
कापूरहोळ येथील स्वागतानंतर आ. शिंदे हे सातारा दिशेने रवाना झाले. जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या नेमणुकीमुळे सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.