खेड शिवापूर (ता. भोर) : राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका चौकीतून उघड झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित चौकीत तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीने एका तथाकथित पत्रकाराने रात्रीच्या वेळी दुकानांवर जाऊन तसेच चौकीत येणाऱ्या नागरिकांकडून मांडवली केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, हा कथित पत्रकार गेल्या काही महिन्यांपासून सर्रास चौकीत वावरत असून, पोलिसी ढंगात वागणूक देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर चौकशीसाठी बोलावलेल्या काही नागरिकांना मारहाण केल्याचे आरोपही होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पाषाण येथील पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कामगार आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक नागरिकांनी खाजगीत या पत्रकार, पोलिस कर्मचारी व झिरो पोलिस यांच्याबाबतचे अनुभव व्यक्त केले आहेत.
“हा पत्रकार नेमका कोण? तो चौकीत इतके दिवस कसा वावरत होता? त्याला कोणाचा पाठिंबा होता? वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार इतके दिवस का आला नाही?” असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी तक्रारी दाखल झाल्यानंतरही शुक्रवारी संध्याकाळी हा कथित पत्रकार पुन्हा चौकीत वावरताना दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे राजगड पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित पत्रकार व पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.