बारामती: येथील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन या मुलींना दारु पाजत हडपसरमधील एका खोलीत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एक आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला असून, या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या 14 सप्टेंबर रोजी घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या होत्या.
या प्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय २०, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) व यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, रा. सावळ, ता. बारामती) यांना अटक केली आहे. तर या घटनेतील एक आरोपी फिरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दारु पाजून केला लैंगिक अत्याचार
या घटनेतील पीडित अल्पवयीन मुली या एसटीने पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला होता. त्याने हडपसरमधील त्याच्या दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. या मुलींपाठोपाठ आटोळे हा देखील बारामतीमधून हडपसरला गेला. येथील एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री मुलींना दारु पाजून या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने लैंगिक शोषण केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
….आणि आईला फोन करुन सांगितला प्रकार
यानंतर या दोन पैकी एका मुलीने आपल्या आईला हडपसरहून फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने बारामती तालुका पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधून बारामतीतून महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना करण्यात आले. 16 सप्टेंबर रोजी या मुलींना बारामती पोलिसांनी आणले.
पालकांनी आपली मुले व मुली यांच्यावर लक्ष ठेवावे. ते कोणत्या मित्र-मैत्रिणीच्या संपर्कात आहेत, याची माहिती घ्यावी. चुकीचा प्रकार आढळून आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी