भोर, ता. १९ फेब्रुवारी: शिरवळ (ता. खंडाळा) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या खून प्रकरणानंतर चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या अजय तुकाराम शिंदे (वय २२) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरवळ पोलिसांवर कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, संध्याकाळपर्यंत काही लोकांच्या मध्यस्थीमुळे त्यांनी आरोप मागे घेतले.
खून प्रकरण आणि चौकशी
शिरवळ येथील औद्योगिक वसाहतीतील चौकात २२ वर्षीय अमर ऊर्फ चंदू शांताराम कोंढाळकर याचा १९ वर्षीय तेजस महेंद्र निगडे (रा. गुणंद, ता. भोर) याने तलवारीने वार करत खून केला होता. घटनेनंतर संशयित तेजस स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. या खून प्रकरणाशी संबंधित असल्याच्या संशयावरून पोलिसांनी अजय शिंदे याला चौकशीसाठी बोलावले होते.
आत्महत्या आणि तणाव
पहिल्या दिवशी अजय कुटुंबीयांसमवेत चौकशीसाठी हजर झाला. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावण्यात आल्यानंतर तो घरी परतला आणि त्यानंतर मंगळवारी त्याने न्हावी (ता. भोर, जि. पुणे) येथील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन भोर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी शिरवळ पोलिसांवर अजयला मारहाण केल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
मध्यस्थीनंतर आरोप संध्याकाळपर्यंत मागे
काही स्थानिक व्यक्ती आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे कुटुंबीयांनी पोलिसांवरील आरोप मागे घेतले आणि मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेने शिरवळ आणि भोर परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु सदर आरोप आर्थिक तडजोडी नंतर मागे घेतल्याची चर्चा मात्र जनमानसात रंगू लागली आहे.
प्रश्न कायम…
पोलिसांच्या मारहाणीनंतर युवकाने आत्महत्या केल्याचे आरोप कुटुंबीयांनी केले, मारहाण कशी हे देखील सांगितले , कुटुंबातील व्यक्तींनी पोलिस युवकाला मारहाण करतानाचा आक्रोश देखील ऐकला, युवकाचे हात पाय सुजले, पट्ट्याने, काठीने मारहाण झाल्याचे युवकाने आत्महत्येपूर्वी कुटुंबियांना सांगितले, पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी समाज माध्यमांसमोर कुटुंबीयांनी केली. तरी देखील पोलिसांवरील आरोप कुटुंबियांकडून मागे कसे असा प्रश्न कायम आहे… वरिष्ठ अधिकारी यावर काय दखल घेणार हे निश्चित पाहणे अपेक्षित आहे.
या विषयासंदर्भात शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.