भोर : तालुक्यातील न्हावी येथील एका तरुणाने पोलिसांच्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय तुकाराम शिंदे (वय २२, रा. न्हावी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, कुटुंबीयांनी शिरवळ पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान निर्घृण हत्येत झाले. बुधवारी रात्री ११:३० वाजता एका कंपनीच्या गेटजवळ अमर शांताराम कोंढाळकर (वय २२, रा. वडवाडी, ता. खंडाळा) याची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी तेजस महेंद्र निगडे (वय १९, रा. गुणंद, ता. भोर) याला शिरवळ पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती, त्यानंतर ती कोठडी तीन दिवसांसाठी वाढवण्यात आली.
या हत्येच्या चौकशीदरम्यान, आरोपीसोबत कंपनीत काम करणाऱ्या इतर तरुणांची देखील पोलिसांकडून चौकशी केली जात होती. त्यात अजय तुकाराम शिंदे यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. सोमवारी (दि. १७) अजय आपल्या कुटुंबासोबत शिरवळ पोलिस ठाण्यात हजर झाला. मात्र, पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत जबर मारहाण केली. मारहाणीनंतर त्याचे हात-पाय सुजले होते. संध्याकाळी सात वाजता त्याला सोडण्यात आले आणि पुढील दिवशी पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले.
मारहाणीच्या भीतीमुळे अजयने आपल्या राहत्या घरी आज सकाळी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजारील नागरिकांनी याची माहिती मिळताच कुटुंबीयांना सांगितले. त्याला तातडीने भोर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर कुटुंबीय आक्रमक झाले असून, पोलिसांच्या मारहाणीमुळे आणि दबावामुळेच अजयने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.