शिरवळ | खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे मंगळवारी सायंकाळी भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. जुन्या भांडणाच्या कारणावरून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला असल्याचा प्राथमिक अंदाज असून यात रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (वय ४०) किरकोळ जखमी झाला आहे. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ५ वाजून १४ मिनिटांनी शिरवळ रेस्ट हाऊस चौकात ही घटना घडली. गोळीबार झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत (फलटण अतिरिक्त चार्ज), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर व फलटण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बदणे सह शिरवळ पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनीही घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास गतीने सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. फॉरेन्सिक लॅबची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून तांत्रिक तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादीच्या माहितीच्या व्यक्तीनेच गोळीबार केल्याचे समोर आले आहे. तरी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
शिरवळसारख्या गजबजलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.