भोर : निवडणूक आली की पावसात बेडके बाहेर येतात तसे काही “सिजनल” राजकारणीही अचानक जनतेसमोर येतात. गावात विकासाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हाल, तरुणांच्या रोजगाराच्या समस्या, महिला सुरक्षेचे मुद्दे — हे सर्व निवडणुकीपूर्वीच आठवतात. निवडणूक संपली की हेच राजकारणी पुन्हा पाच वर्षे बेपत्ता होतात.
भोर तालुक्यात सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची चाहूल लागल्याने इच्छुकांची भाऊगर्दी दिसू लागली आहे. अनेक ठिकाणी बॅनर, पोस्टर, सोशल मीडियावर जाहिरातींची रेलचेल सुरू झाली आहे. जनतेला ‘विकास’च्या नावाखाली गोड बोलून पुन्हा फसविण्याचा प्रयत्न होत आहे.
या सगळ्या खेळामध्ये मतदार केवळ प्याद्याप्रमाणे वापरला जातो. राजकारण आता सेवा नव्हे तर व्यवसाय बनला आहे. जनतेच्या भावना, दुःख आणि अपेक्षा यांचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला जातो. निवडणुकीच्या काळात फुकट दिवाळी भेटी, दर्शन यात्रा, समाजसेवेचे दिखावे आणि मोठ्या भाषणांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असतो. मात्र मतदानानंतर हेच चेहरे गायब होतात.
भोर तालुका आजही मूलभूत सुविधांच्या अभावाने त्रस्त आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात अजूनही अपूर्ण कामे प्रलंबित आहेत. तरीसुद्धा विकासाऐवजी गटबाजी आणि स्वार्थी राजकारणावर भर दिला जात आहे.
जनतेने आता या सिजनल राजकारण्यांची ओळख पटवून सजग मतदार म्हणून भूमिका बजावण्याची वेळ आली आहे. कारण निवडणूक ही केवळ राजकारण्यांची संधी नसून, गावाच्या विकासासाठी लोकशाहीचा उत्सव आहे — आणि तो स्वार्थासाठी नव्हे, समाजहितासाठी साजरा होणे गरजेचे आहे.













