पुणे: शहरात अनेक खळबळजनक घटना घडत असतानाच अशा प्रकारची एक घटना येथील विश्रांतवाडी (vishranthwadi koyta murder) परिसरात घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका २५ वर्षीय विवाहितेची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी अमोल दिलीप कांबळे याला पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल कांबळे आणि गौरी हे दोघे एकाच शाळेत शिकत होते. शाळेत असल्यापासून अमोलचे गौरीवर एकतर्फी प्रेम होते. माझ्याशी लग्न कर म्हणून त्याने गौरीकडे तगादा लावला होता. परंतु गौरीला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते, तसे तिने त्याला सांगितले देखील होते. त्यानंतर गौरीचे लग्न तिच्या कुटुंबाच्या मर्जीने लणेश धनाजी आरे यांच्यासोबत करण्यात आले होते.
रस्त्यावरून चालत जाणाऱ्या गौरीवर केले कोयत्याने सपासप वार
गैरीने लग्न केल्यामुळे आरोपी अमोल कांबळे हा सुडाने पेटला होता. त्यातच गौरीने त्याच्याशी बोलणे बंद केल्यामुळे तो आणखीच चिडला. इन्स्टाग्रामवर गौरी आणि तिच्या पतीचा फोटो टाकून त्यावर भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट त्याने टाकली. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास गौरी आपल्या मैत्रिणीसोबत पायी घरी येत असताना तिच्यावर आरोपीने कोयत्याने सपासप वार केला. या घटनेत गौरी गंभीर जखमी झाली. यानंतर तातडीने गौरीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपाचार सुरू असताना तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी गौरीच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.