कामथडी: कामथडी तलाठी कार्यालयाच्या जवळच मोठ्या प्रमाणात अनधिकृत मुरूम उत्खनन करून टाकत असल्याचे राजगड न्यूजला माहिती मिळाली आहे. या प्रकरणात स्थानिक तलाठी यांच्या आर्थिक हितसंबंध असल्याचा सढळ पुरावाही राजगड न्यूजच्या हाती लागला आहे तर याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामथडी तलाठी कार्यालयापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे अनधिकृत मुरूम उत्खनन होत आहे.हे उत्खनन करून तलाठी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बस स्टॉप शेजारी हे उत्खनन केलेला मुरून टाकला जात आहे.हे उत्खनन बेकायदेशीररित्या आणि कोणत्याही परवानगीशिवाय केले जात आहे. तर ज्या ठिकाणी टाकले जात आहे ते देखील बेकायदेशीर आहे.यामुळे परिसरातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणी राजगड न्युज ने तलाठी यांच्याशी संपर्क करून माहिती विचारली असता तलाठ्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तलाठ्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “हा मुरूम कोणी खाजगी व्यक्तीने त्याच्या जागेवर टाकला आहे,कोठे टाकला आहे, आम्हाला तर माहित नाही, आम्ही निवडणुक कामात आहोत,आले की कारवाई करू आणि साहेबाना विचारून कारवाई करू. अशी स्पष्ट उडवाउडवीची उत्तरे दिली असून शासनाचा महसूल बुडविण्यास कोण जबाबदार आहे हे वरिष्ठांनी तपासणे अपेक्षित आहे.
यानंतर राजगड न्यूजच्या टीमने स्थानिक लोकांशी संपर्क साधला. लोकांनी सांगितले की, हे अनधिकृत मुरूम उत्खनन स्थानिक तलाठी यांच्या संरक्षणाखाली होत आहे. तलाठी यांनी या उत्खननातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घेतला आहे, असा आरोपही लोकांनी केला आहे.
राजगड न्यूजच्या टीमने या प्रकरणाचा पुरावा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यातून काही धक्कादायक तथ्य समोर आली आहेत. राजगड न्यूज लवकरच या प्रकरणाचा पूर्णपणे पर्दाफाश करणार आहे.
कामथडी तलाठी कार्यालयाच्या जवळच हे अनधिकृत मुरूम उत्खनन कसे होत आहे? स्थानिक तलाठी यांना या प्रकरणाची माहिती आहे का? तलाठी यांनी या उत्खननाला परवानगी दिली आहे का?तलाठी यांनी या उत्खननातून आर्थिक लाभ घेतला आहे का? असे या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.या प्रकरणाचा शासनाने त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. तर शासनाचा महसूल बुडविला जात असून राजगड न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे आणि लवकरच या प्रकरणाचा पूर्णपणे पर्दाफाश करणार आहे.