भोर: रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदीर आणि परिसराचा सातबारा हा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने (rayareshawar dongari vikas parishad) आपल्या नावावर करून घेतला असल्याचा आरोप करीत तो रद्द करावा आणि तत्कालीन तहसीलदार आणि रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे तालुका उपाध्यक्ष आणि आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर यांनी बुधवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत.
घोडेकर यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रायरेश्वर पठारावरील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते पवित्र शिवमंदीर हे रायरी (ता. भोर) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सव्हें नं.२०२/३ व २०२/३ मध्ये आहे. या सर्व्हे नंबरच्या सातबाऱ्यावर फेरफार क्रमांक ६२४ आणि ६२५ नुसार सदरची १२ आर एवढी जागा ही रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेतर्फे अनंतराव नारायण थोपटे यांची नोंद केली आहे.
माहितीच्या अधिकारात याची माहिती मागविण्यात आली असता रायरेश्वर पठारावरील संबंधित सर्व्हे नंबरमधील फेरफार नंबर ६२४ व ६२५ या फेरफाराची हक्कनोंदणी पुस्तक न्यायालयीन कामकाजासाठी भोर पोलीस ठाणे येथे जमा केले असल्याबाबत अभिलेख कक्ष भोर अभिलेखातील कागदपत्रानुसार दिसून येत आहे. भोर पोलीस ठाण्याकडून सदरचे फेरफार भोर पोलीस ठाण्याच्या आभिलेखावर उपलब्ध नसल्याचे पोलिसांनी लेखी दिले असल्याचे घोडेकर यांचे म्हणणे आहे.
रायरेश्वर डोंगरी विकास परिषद आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने जमीनी संस्थेच्या नावावर केल्याचा संशय असल्याचे घोडेकर यांचे म्हणणे आहे. याबाबत २० ऑगस्टला प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला असून, त्याच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि विरोधीपक्ष नेते यांना पाठविल्या असल्याचे घोडेकर यांनी सांगितले आहे. याबाबत रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.