नसरापूर | प्रतिनिधी : पुणे ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थांविरोधात राजगड पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत गाऊडदरा येथे गांजा व हाशिशसदृश पदार्थांची विक्री उघडकीस आणली आहे. या प्रकरणी पुष्पा शिंदे (पूर्ण नाव माहित नाही, रा. गाऊडदरा, ता. हवेली, जि. पुणे) या महिलेसह तिच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा शिंदे व तिच्यासोबत असलेले दोन अनोळखी पुरुष अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या पदार्थ बाळगत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर राजगड पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई केली. कारवाईदरम्यान आरोपींच्या ताब्यातून गांजासदृश पदार्थाच्या चार पुठ्ठ्या तसेच हाशिशसारख्या तपकिरी रंगाच्या घट्ट पदार्थाने भरलेले तीन बॉक्स जप्त करण्यात आले.
जप्त केलेल्या बॉक्समध्ये एकूण 35 लहान डब्या असून प्रत्येकी अंदाजे 500 रुपये किंमतीचा हाशिशसदृश पदार्थ आढळून आला. जप्त सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 19,500 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी महिला पोलीस हवालदार प्रमिला शरद निकम यांनी फिर्याद दिली असून, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.
अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात राजगड पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, परिसरातील तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत ढकलणाऱ्या धंद्यांवर पुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.














