खेड शिवापूर | प्रतिनिधी: राजगड पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवगंगा खोऱ्यातील पानटपरीवर गुरुवारी (दि. १० जुलै) रात्रीच्या सुमारास कोयता गँगने अचानक हल्ला करत टपरीतील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे घटनेला दोन दिवस उलटूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन टपरीवर आले आणि क्षणार्धात हल्ला चढवून सर्व साहित्याची नासधूस केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं समजतं.
या घटनेची माहिती नागरिकांनी आणि स्थानिक पत्रकारांनी तात्काळ पोलिसांना दिली होती. मात्र, दोन दिवस उलटूनही राजगड पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेतलेली नाही. उलट, या घटनेबाबत चौकशी, सीसीटीव्ही फुटेज तपास किंवा गुन्हा दाखल करण्याबाबत कोणतीही ठोस हालचाल झाली नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद?
घटनास्थळ अगदी पोलीस चौकीपासून काही मीटर अंतरावर असूनही पोलिसांच्या ताफ्याचा तिथे न पोहोचणं, हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप नागरिकांकडून होऊ लागले आहेत. “पोलिसच जर दुर्लक्ष करत असतील, तर नागरिकांनी सुरक्षा कुणाकडून अपेक्षित ठेवायची?” असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
या प्रकारामुळे परिसरातील व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे. “दुकाने बंद करावीत का?” असा प्रश्न काही व्यावसायिक विचारू लागले आहेत. दिवसाढवळ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिकच बळावली आहे.
पोलिसांचे उत्तर अधिकच धक्कादायक
या घटनेबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी अनेक वेळा संपर्क साधल्यावर राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी “ठीक आहे, बघतो” एवढेच उत्तर दिले. अशा प्रकारचे बेजबाबदार उत्तर दिल्यामुळे पोलिस प्रशासनाविषयीचा रोष अधिक वाढला आहे.
या घटनेमुळे शिवगंगा खोऱ्यातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून पोलीस खात्याने तात्काळ कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.