भोर/राजगड : भोर आणि राजगड तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणाऱ्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने मंजुरी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोर-राजगड परिसरातील रस्त्यांच्या सुधारणा व काँक्रीटीकरणाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवतरे यांनी दिलेल्या निवेदनात PMRDA च्या हद्दीत येणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणा कामांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या रस्त्यांच्या कामांत वळणांमध्ये सुधारणा, पूल बांधणी, रुंदीकरण करून किमान १० मीटर रुंद काँक्रीट रस्ते तयार करणे, तसेच आवश्यकतेनुसार जमीन संपादनाची प्रक्रिया राबविणे यांचा समावेश करण्यात यावा, अशी ठळक मागणी करण्यात आली आहे. या सुधारणा झाल्यास वाहतुकीची सोय सुलभ होईल, अपघाताचे प्रमाण कमी होईल तसेच ग्रामीण भागातील आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे शिवतरे यांनी स्पष्ट केले.
निवेदनात दोन प्रमुख रस्त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
१) सारोळा – वीर रस्ता (रामा १३२) : किमी ०/०० ते १६/५०० या दरम्यान रस्ता सुधारणा.
२) चेलाडी फाटा – नसरापूर ते करजांवणे ते पाबे रस्ता (रामा १०६) : किमी ०/०० ते २६/५०० या दरम्यान रस्ते सुधारणा.
या दोन्ही रस्त्यांचे सर्वेक्षण करून कामे प्राधान्याने मंजूर करण्यात यावीत आणि संबंधित विभागांना आदेश द्यावेत, अशी मागणी शिवतरे यांनी केली.
या मागणीमुळे भोर-राजगड तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.