राजगड न्यूज सदैव निःपक्ष, बांधिलकीची भूमिका घेत वाचकांसमोर वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत आली आहे. “रणांगण निवडणुकीचे” या मालिकेतून मतदारांचे प्रश्न, त्यांची अपेक्षा आणि लोकशाहीतील खरी कसोटी ठरलेले मुद्दे यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या मालिकेत कोणत्याही पक्षाचा प्रचार नसून, जनतेच्या मनातील प्रश्नांचा आरसा दाखवण्याचा आमचा उद्देश आहे.
🟦 संपादकीय हेतू
• पुणे-सातारा जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या राजगड न्यूज कडून वाचकांसाठी आजपासून एक नवे सत्र सुरू होत आहे. या सत्राचे नाव आहे “रणांगण निवडणुकीचे”. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन हे सत्र सुरू करण्यात आले आहे.
निवडणूक हा फक्त उमेदवारांचा खेळ नसून, तो प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नांचा आणि त्यांच्या अपेक्षांचा लढा असतो. म्हणूनच या मालिकेत जनतेचे प्रश्न, अपेक्षा आणि मते यांनाच जास्त महत्त्व दिले जाणार आहे.
आजवर निवडणुकीच्या काळात विविध आश्वासने दिली जातात, मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, परंतु मतदारांच्या खरी गरजा नेहमीच दुय्यम ठरतात. म्हणूनच या विशेष मालिकेत आम्ही मतदारांना केंद्रस्थानी ठेवून चर्चा मांडणार आहोत. “उमेदवार कसा असावा?” हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. केवळ पैसा, सत्ता किंवा जातीय समीकरण यावर उमेदवाराची निवड होऊ नये, तर त्याची योग्यता, चारित्र्य, समाजातील कार्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता महत्त्वाची ठरावी, असा जनतेचा ठाम आग्रह असतो.
या मालिकेत आम्ही गावोगावी, तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन लोकांचे विचार जाणून घेणार आहोत. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, तरुणांचे रोजगार, महिला सुरक्षेसारखे प्रश्न नेहमीच अग्रस्थानी राहिले पाहिजेत. याचबरोबर ग्रामविकासात पारदर्शकता, लोकसहभाग आणि जबाबदारी या गोष्टी उमेदवारांकडून अपेक्षित आहेत.
राजगड न्यूज या माध्यमातून या सर्व मुद्द्यांवर निःपक्ष आणि बांधिलकीच्या भूमिकेतून चर्चा होईल. कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार न करता, जनतेच्या बाजूने खरा आरसा दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल. मतदारांना त्यांच्या हक्काचा, योग्य आणि जाणिवपूर्वक निर्णय घेण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.
आगामी दिवसांत “रणांगण निवडणुकीचे” या माध्यमातून आपण सर्वजण मिळून लोकशाहीला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करू या.
📢 आवाहन :
आपल्या भागातील, आपल्या परिसरातील, आपल्या गावातील काही प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, ज्या आजपर्यंत निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी पूर्ण केलेल्या नाहीत, फक्त आश्वासनांची खिरापत वाटली असेल, तर त्याबाबत आपण आमच्यापर्यंत मांडा. आम्ही तो प्रश्न पुन्हा विचारून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.
👉 आपले प्रश्न आम्हाला पाठवण्यासाठी : +91 77 70 020202 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा.
संपादक, राजगड न्यूज