राजगड : विरोधकांमध्ये फोडाफोडीची नीती राबविणारा भाजपच सध्या अंतर्गत मतभेदांच्या भोवऱ्यात सापडला आहे.
राजगड तालुक्यातील भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी उफाळून आली असून, पक्षातील तणाव आता उघडपणे समोर आला आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव शुभम बेलदरे यांनी तालुकाध्यक्ष राजू रेणुसे यांच्याविरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार १९ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आली असून, ती पक्षांतर्गत वादातून निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने तालुक्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीची माहिती बेलदरे यांना न मिळाल्याने त्यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया ग्रुपवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तालुकाध्यक्ष रेणुसे यांनी बेलदरे यांना फोन करून दमदाटी व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यापूर्वीही रेणुसे यांच्याकडून अशा प्रकारचे वर्तन झाल्याचा दावा बेलदरे यांनी केला आहे. तर या तक्रारीवरून तालुकाध्यक्ष राजू रेनुस यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तालुकाध्यक्ष राजू रेणुसे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, बैठकीचा संदेश चार दिवस आधीच अधिकृत ग्रुपवर पाठवण्यात आला होता आणि कोणालाही वैयक्तिक फोन करून निमंत्रण देण्यात आले नव्हते. बेलदरे यांचे सर्व आरोप निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकारामुळे राजगड तालुक्यातील भाजप संघटनेतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे. कार्यकर्त्यांमधील वाढत्या मतभेदांमुळे पक्षाच्या कामकाजावर आणि एकजुटीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेल्हे पोलिसांनी या तक्रारीवर चौकशी सुरू केली असून, या घटनेचा आगामी राजकीय समीकरणांवर कोणता परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

















