कापूरहोळ (ता. भोर) : युवा शेतकरी संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे यांनी राजगड (वेल्हे) तालुक्यातील ७८ गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचा ऐतिहासिक संकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी कापूरहोळ येथील राजवाडा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या शिवउपक्रमाला श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज फाउंडेशनचे महत्त्वपूर्ण योगदान लाभणार असून, खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज यांनी या संकल्पासाठी पूर्ण सहकार्य आणि मदतीची हमी दिली आहे. फाउंडेशनचे अतुलशेठ हिवाळे यांनी या ऐतिहासिक उपक्रमाला पाठिंबा दर्शविला.
युवा शेतकरी संघाच्या माध्यमातून उभारला जाणारा हा उपक्रम फक्त पुतळ्यांपुरता मर्यादित नसून, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे. या उपक्रमामुळे राजगड तालुक्यातील गावे शिवमय होतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याची महती पुढील पिढ्यांना कळेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला अतुलशेठ हिवाळे व मित्रपरिवार, युवा शेतकरी संघाचे उपाध्यक्ष दिगंबर चोरघे, तांभाड गावचे सरपंच अमोल शिळीमकर, तसेच रोहिदास बापू चोरघे मित्रपरिवार आणि शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा शेतकरी संघाचे अध्यक्ष रोहिदास बापू चोरघे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करू. हा प्रकल्प केवळ पुतळे उभारण्याचा नसून, भविष्यातील पिढ्यांना शिवचरित्र शिकवण्याचा आहे.
“संघाचे उपाध्यक्ष दिगंबर चोरघे म्हणाले की, “आजच्या तरुणांनी शिवचरित्र समजून घेतले पाहिजे. हा उपक्रम त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.”
या ऐतिहासिक संकल्पामुळे राजगड तालुका शिवमय होणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रेरणादायी स्मारक उभारले जाणार आहे.