भोर: गुंजवणी नदीपात्रामध्ये संशयास्पद बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला होता. त्या दृष्टीने तपास करण्यात यावा असे नातेवाईकांचे म्हणणे होते. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली असून, मयत व्यक्तीच्या नात्यातीलच तरुणाने मयत गणपत गेनबा खुटवड यांचा खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये तो देवऋषी होता त्याने माझ्यावर देव घातला आणि माझ्या आयुष्याचे वाटोळे केले या अंद्धश्रद्धेतून सदर व्यक्तीचा खून झाला असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
गणपत गेनबा खुटवड (वय ५२ रा. हातवे खुर्द ता. भोर ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ही घटना हातवे ( ता. भोर ) येथील गुंजवणी नदी बंधारा पात्रात रविवारी ( दि. २२ ) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी स्वप्निल उर्फ बंटी ज्ञानोबा खुटवड (वय ३० रा. हातवे खुर्द ता. भोर ) याच्यावर खून केल्या प्रकरणी सोमवारी ( दि. २५ ) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगड पोलीस आणि पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्त कारवाई करून आरोपीला जेरबंद करून अटक केली आहे.
गुंजवणी नदीपात्रामध्ये गणपत खुटवड आणि स्वप्निल उर्फ बंटी खुटवड यांच्यात वादावाद सुरू असताना स्वप्निल शेलार हा त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मधस्थी म्हणून गेला. यावेळी आरोपी स्वप्नील खुटवड याने स्वप्निल शेलारला येथून ‘शून्य मिनिटात येथून निघ’ नाही तर तुझ्याकडे बघावे लागेल, अशी धमकी दिली. यानंतर स्वप्नील उर्फ बंटी खुटवड याने गणपत खुटवड यांच्या डोक्यात व डोळाचे भुवईच्यावरती जखमा करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी संदीप अरूण खुटवड यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक दत्ता मोहिते, कुलदीप सपकाळ, अभिजित सावंत, पोलीस नाईक अमोल शेडगे, तुषार भोईटे, पोलीस शिपाई मंगेश भगत, सागर नामदास तसेच पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार नाना मदने, पोलीस शिपाई अक्षय नलावडे तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई करून आरोपीला जेरबंद केले आहे. तसेच आरोपी याच्याबरोबर अन्य साथीदार होते का? याचा देखील तपास पोलीस करीत आहेत.
आरोपी मयताच्या अंतविधीवेळी उपस्थित होता सूत्रांची माहिती
आरोपी हा स्वःताह गावातील व्यक्तींबरोबर सीसीटीव्ही चेक करण्यासाठी फिरत होता. तसेच मयताच्या अंतविधी आणि सावडण्यासाठीच्या वेळी देखील उपस्थित होता. त्यानंतर तो गायब झाला आणि पोलिसांनी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.
कसा झाला खून?
आरोपी आणि मयत यांचे जुने वाद होते. वादाचे कारण अंद्धश्रद्धा असल्याची माहिती मिळत आहे. संबधित मयत व्यक्ती ही देवऋषी होती. आरोपी आणि त्यांच्यात किरकोळ वाद होते. तसेच आरोपीच्या मनात मयत व्यक्तीने त्याच्यावर देव घातला. यामुळे लग्न होत नाही, वृद्धी होत नाही, ही गोष्ट सलत होती. याचाच मनात राग धरुन घटनेच्या दिवशी त्या पूलावर आरोपी आणि मयताचे वाद झाले. त्या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. आरोपीने मयताला फरपटत नेले आणि ढकलेले. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी घरी निघून गेला. कोणाला संशय येवू नये म्हणून आरोपी त्यांच्यातच फिरत राहिला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.