नसरापूर | राजगड पोलीस स्टेशनने नागरिकांचा विश्वास जिंकणारी व स्तुत्य अशी कामगिरी केली आहे. पोलीसांनी चालू वर्षात गहाळ झालेली एकूण ५६ मोबाईल फोन आणि एक सोन्याची अंगठी असा सुमारे ५.४८ लाख रुपयांचा मुददेमाल शोधून काढत मूळ मालकांच्या ताब्यात परत केला आहे.
पुण्याच्या महाळुंगे येथील रहिवासी सनत सुहास मोहरीर (वय २९) हे आपल्या पत्नीसमवेत नसरापूर येथील बनेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले असता, दर्शनानंतर परत जाताना त्यांच्या खिशातून लग्नातील सोन्याची अंगठी निसटून पडली. त्यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. या माध्यमातून तात्काळ तपास करत त्यांनी सदर अंगठी शोधून ताब्यात घेतली आणि तक्रारदार मोहरीर यांना ती परत केली.
याचबरोबर राजगड पोलीसांनी ५६ गहाळ मोबाईल फोन (एकूण किंमत अंदाजे ४.४८ लाख रुपये) शोधून मूळ मालकांच्या हवाली केले आहेत. सोन्याची अंगठी अंदाजे १ लाख रुपये किंमतीची होती. अशा प्रकारे एकूण ५.४८ लाख रुपये किंमतीचा मौल्यवान मुददेमाल पोलिसांनी अल्पावधीत परत केला आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत असून, त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तसेच पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कार्यात पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, अंमलदार चव्हाण, अक्षय नलावडे, मंगेश कुंभार आणि अजय चांदा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही कामगिरी जनतेच्या मनात पोलीस यंत्रणेबद्दलचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.