खेड शिवापूर: बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या विविध शाळांमध्ये विद्यार्थिंनीना महिला पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहेत. तसेच महिला कायद्याबद्दलची माहिती शाळेतील विद्यार्थिंनीना देण्यात येत आहे. खेड-शिवापूर (ता. हवेली) येथील शिवभूमी विद्यालयातील आठवी व नववीच्या विद्यार्थिनींना राजगड पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी प्रमिला निकम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी निकम यांनी गुड टच बॅड टच कसे ओळखावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिला कायदेविषयक माहिती देत निर्भया संदर्भात जागृती करून पोस्को व सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. अडचणीच्यावेळी मुलींनी डायल ११२ या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच राजगड पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचाऱ्यांचे फोन नंबर देऊन त्यांना देखील संपर्क साधण्याचे आवाहन विद्यार्थिंनीना केले.
अनेक विद्यार्थिनींनी शाळेत आयोजित केलेल्या या मार्गदर्शन सत्रास उपस्थिती दर्शवली. यावेळी शिवभूमी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, शिक्षिका सविता भरगुडे, शुभांगी निगडे, मंजूषा मुंडे आदी उपस्थित होत्या.