राजगड: भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे (sangram thopate) यांच्या पाठपुराव्यामुळे राजगड (वेल्हे) तालुक्यातील तब्बल २८ कोटी ३४ लाख २४ हजार रुपये विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. यामध्ये गुंजवणी प्रकल्पाअंतर्गत कानंद-घेव्हडे- घिसर डांंबरीकरणासाठी १२ कोटी ३५ लाख २४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असून,तालुक्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी विकास खरात, तहसिलदार श्रीनिवास ठाणे, गटविकास अधिकारी पंकज शेळके उपस्थित होते.
यावेळी निवडणुकीनंतर पहिल्यांदा तालुक्यात आले आहे, भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल खा. सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमात येथील नागरिकांचे आभार मानले. तसेच बारामती लोकसभा निवडणूकीची खरी सुरुवात संग्राम थोपटेंच्या भोरमधील हरीशचांद्री येथे झालेल्या विराट सभेपासून झाली असल्याची आठवण सुळेंंनी यावेळी सांगितली. मागचे सगळे विसरून आता आपल्याला एकत्र काम करायचे आहे, असे म्हणत निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना सुळेंनी दिल्या.
या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी राज्यात महिला अत्याचार वाढत आहेत, बहिणी उशिरा आठवल्या, त्यांच्या उपक्रमाचे स्वागत, पण महिला म्हणत आहेत आम्हाला तुमचे 1500 रुपये नको, आम्हाला महिला सुरक्षित पाहिजेत हे सगळे टीव्हीवर ऐकत असल्याचे सांगितले. तसेच राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेच्या अनुषंगाने जेवेढे काही पुतळे आहेत, त्यांचे स्ट्रुक्टरल ऑडिट करून घ्या, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या कारण हा आमच्या अस्मितेचा विषय असल्याचे सुळे यांनी सांगितले. मालवणमधील पुतळा कोसळ्याच्या घटनेवरून सुळे यांचा आपल्या भाषणामधून सरकारववर निशाणा साधला. वेल्ह्यामध्ये टुरिझम वाढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देत राजगड, तोरणा किल्ल्यावर कामे सुरु असल्याची सुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.