भोर (प्रतिनिधी) : भोर तालुक्यातील राजापुर गावात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८६ हजार ४०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार वसंत मोरे (वय ४० वर्षे, रा. गंगोत्री बिल्डिंग, वानवडी, पुणे. मूळ रा. राजापुर, ता. भोर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी मोरे यांचे राजापुर गावातील घर १८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी बंद होते. त्या दिवशी सायंकाळी ६ ते १९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० या कालावधीत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकरमधून सोनं-चांदीचे दागिने चोरून नेले. त्यामध्ये ८ ग्रॅमची सोन्याची चैन (किंमत रु. ६४,०००), २ ग्रॅमचे सोन्याचे कानातील पुड्या (२ नग, किंमत रु. ८,०००), १ ग्रॅमची मुलीची जोती (किंमत रु. ८,०००), तसेच ८० ग्रॅम वजनाचे चार चांदीचे कडे व वाळे (किंमत रु. ६,४००) असा एकूण ८६,४०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार माणे करीत आहेत.