पुणेः साधारण दोन दिवसांपूर्वी खडवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर शहरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आणि शहरातील विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली. येथील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांचा संसार या पूराच्या पाण्यात त्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेला. यामुळे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील विविध भागातील बाधीत नागरिकांसोबत संवाद साधत पूरस्थितीचा आढावा घेतला. राज यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत सरकारावर ताशेरे ओढले.
शहराचा डेव्हल्मेट प्लॅन तयार करण्यात येतो. त्यासोबतच टॅाउन प्लॅन देखील सगळ्यांसमोर आला पाहिजे, शहरातील सर्व राजकीय पक्षांनी आपापले हवेदावे बाजूला सारुन शहराच्या या मुद्यावर एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यामुळे पुणे शहराची विस्कटलेली पुन्हा पूर्वपदावर येईल, असे ते यावेळी म्हणाले. तसेच अनेक संस्था आहेत, त्यांनी आपली कामे चोख बजावित नसल्याने सध्याची पूरस्थिती शहरात ओढावली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जगभरातील अनेक शहरांच्या मध्यमागातून नदी वाहते. पुणे शहरातच का पूर स्थिती निर्माण होते, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा आहे. नदीसुधार प्रकल्प राबविणार असाल, तर त्या सगळ्याची माहिती येथल्या रहिवाशांना विस्ताराने सांगायला पाहिजे, असेही ते म्हणाले.
एकता नगर भागात पाहणी करताना येथील एका मातेने तीन दिवसांपूर्वी आपल्या मुलाने गमावले आहे. त्या मातेने मोठ्या धैर्याने आणि हिमतीने प्रशासनाने याकडे लक्ष्य दिले पाहिजे, हे ठामपणे सांगितले. याचे खरेतर मला आश्चर्य वाटले. यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, एका मातेला कळलं, तर प्रशासनाला का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी प्रशासनाला केला आहे. या पूरस्थितीसाठी पालिकेच्या एका अधिकाऱ्याला जबाबदार ठरवत त्या संबधित अधिकाऱ्यावर पालिकेने निलंबनाची कारवाई केली आहे, या प्रश्नावर बोलताना ठाकरे म्हणाले की, कारवाई करून प्रश्न सुटणार आहेत का? असा प्रतिसवाल त्यांनी पालिका प्रशासनाला केला आहे.