दौंड (संदीप पानसरे ) – यवत पोलिसांनी एका धक्कादायक हत्येचा छडा लावला असून, सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव रचून चुलतीची हत्या करणाऱ्या पुतण्याचा भयानक कट उघडकीस आला आहे.
दि. ७ डिसेंबर २०२४ रोजी लता बबन धावडे (रा. कडेठाण, ता. दौंड, जि. पुणे) दुपारी जेवण करून कांद्याच्या रोपातील गवत खुरपण्यासाठी शेतात गेल्या होत्या. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत त्या परत न आल्याने पती बबन धावडे यांनी त्यांचा शोध घेतला. काही वेळानंतर लता धावडे यांचा मृतदेह दादा लालासो दिवेकर यांच्या वरवंड येथील उसाच्या शेताजवळ आढळून आला. त्यांचा चेहरा गंभीर जखमी अवस्थेत होता, आणि तो पूर्णतः ओरबडलेला असल्याने प्रथमदर्शनी हा बिबट्याचा हल्ला वाटला.
यवत पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी वैद्यकीय अहवाल आणि गोपनीय माहितीच्या आधारे सखोल तपास केला असता, हा बिबट्याचा हल्ला नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संशयित सतीलाल वाल्मीक मोरे (वय ३०, रा. तिकी, ता. चाळीसगाव, जि. धुळे, सध्या रा. कडेठाण, ता. दौंड) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याच्या म्हणण्यानुसार, लता धावडे यांचा पुतण्या अनिल पोपट धावडे आणि त्याने मिळून लता यांचा दगडाने ठेचून खून केला आणि त्याला बिबट्याच्या हल्ल्याचा अपघात असल्याचा बनाव रचण्यास सांगितले.
पोलिसांनी या कबुली जबाबानंतर अनिल धावडे आणि सतीलाल मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरानदार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, किशोर वागन आणि पोलीस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.