सासवड: येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी जागतिक पत्रलेखन दिनाचे औचित्य साधून शाळेच्या माजी विद्यार्थ्याना पत्र लिहिली आहेत. मोबाईलच्या युगात पत्रव्यवहार आज देखील महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तसेच माजी विद्यार्थ्यांना शाळेविषयी ओढ वाटावी यासाठी शाळेच्या चौथीतील विद्यार्थ्यांनी सन १९८६ ते २०१५ या कालावधीत शाळेत शिकलेल्या तीनशे विद्यार्थ्यांना पत्र लिहून त्यांच्याशी संवाद साधला आहे.
दि. २१ जुलै ते ५ सप्टेंबर या कालावधीत शाळेत कृतज्ञता समारोह आयोजित केला आहे, त्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट द्यावी असा आग्रह चिमुकल्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केला आहे. माजी विद्यार्थ्यांना बालपणी आपण ज्या शाळेत शिकलो त्या आठवणींना उजाळा यातून मिळावा अशी अपेक्षा या पत्रलेखनातून मिळेल अशी आशा शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे व सुधीर भोसले यांनी व्यक्त केली. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, मंजुषा चोरामले यांनी मार्गदर्शन केले. शारदा यादव, माणिक शेंडकर, मीना खोमणे यांनी विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून घेतली.