जेजुरीः राज्यात २८८ विधानसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी छोटे मोठे वादाचे प्रसंग घडले. यामुळे मतदान प्रक्रियेला काही ठिकाणी गालबोट लागले. पुरंदर विधानसभा मतदार संघात मात्र मतदारांनी मोठ्या उत्साही वातावरणात मतदान केले. काही मतदान केंद्रांवर तर रात्री उशिरा मतदान घेण्यात आले. याचे कारण सायंकाळी अचानकपणे मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रांवर दाखल झाले होते. परिणामी मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागला. शनिवारी म्हणजेच दि. २३ नोव्हेंबर रोजी निकालचा दिवस असल्याने त्या दिवशी पुरंदर विधानसभेचा आमदार कोण, हे समजणार आहे. मात्र, निकालाआधीच संजय जगताप यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्या देण्यात आल्या आहेत.
पुरंदर विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा असा उल्लेख सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये आहे. यामुळे निकालाआधीचे जगताप यांच्या समर्थकांनी संजय जगताप यांना आमदार म्हणून घोषित केले आहे. मूळात या मतदार संघाची निवडणूक कधी नव्हे ती इतकी रंगतदार झाली. तिरंगी चुरशीच्या लढतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे जगताप यांच्या समर्थकांमध्ये तेच पुरंदरचे आमदार होतील, असा आत्मविश्वास असल्याचे त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरवरून त्यांनी सांगितले आहे. परंतु, येणाऱ्या २३ नोव्हेंबर या दिवशीच पुरंदरचा आमदार कोण याचे उत्तर मिळणार आहे.