पुरंदरः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याला लागून असलेल्या पुरंदर २०२ विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. खरंतर लोकसभेच्या निवडणुकीतच विधानसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेकांनी पक्षांतर केले. या पक्षांतराची चर्चा तालुक्यात झाली. लोकसभेच्या निवडणुनंतर तालुक्यात आपला दबदबा प्रस्थापित करून अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आणि विधानसभेचे रणशिंग फुंगले. राज्यात अजूनही युती आणि आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. यातच तालुक्यातून अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट केली असून, पक्षातील बड्या नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र सुरू झाले आहे. यातून एकप्रकारे तिकीट मिळविण्याची धावपळ संभाव्य उमेदवारांकडून केली जात आहे.
पुरंदर आणि हवेली अशा दोन भागात हा मतदारसंघ विभागला असून, यामध्ये ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही मतदारांचा भरणा आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निर्णय अधिकारी म्हणून वर्षा लांडगे या काम पाहणार आहेत. शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, शासकीय कामांचे नियोजन करण्यात येत आहे. या मतदारसंघात ४ लाख ५८ हजार २८२ एकूण मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २ लाख ३८ हजार १ असून, महिला मतदारांची संख्या २ लाख २० हजार २४९ आहे. या मतदारसंघाची निवडणूक दोन मुख्य प्रश्नांभोवती फिरवली जाते. यातला पहिला प्रश्न म्हणजे पाणी आणि दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ. या दोन प्रश्नांवर उमेदवार येथून जिंकून येतात. मात्र, सध्याची घडी पाहता येथला मतदारराजा जागृक झाला आहे.
बंडखोरी होण्याची शक्यता
युती आणि आघाडीकडून अनेक इच्छुक चेहरे निवडणूकीचे मैदान लढवायला तयार आहेत. यामध्ये युती आणि आघाडीकडून काही नावांची चर्चा होत आहे. यात पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार आणि कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. यामुळे कदाचित बंडखोरी होऊन चित्र ऐन निवडणूक काळात वेगळे असू शकते अशी देखील शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात बंडखोरी झाल्यास आश्चार्य वाटायला नको.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने सोशल मीडियाचा प्रभावी वापर नेतेमंडळी करताना दिसत आहेत. यात कमी काय म्हणून कार्यकर्त अॅक्टिव्ह मोडवर असून, त्यांच्याकडून देखील आपल्या नेत्याचा प्रचार व प्रसार कसा जास्तीत जास्त होईल, याची काळजी घेतली जात आहे.