पुरंदर तालुक्यातील गुंजवणीचा पाणी प्रश्न, पुरंदरचे आंतराराष्ट्रीय विमानतळ, पुरंदरला आयटी पार्क, पुरंदर उपसा सिंचन योजना या आणि अशा विविध प्रलंबित विषयांसाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्रालयात बैठक पार पडली होती. या बैठकीला पुरंदरचे आमदार संजय जगताप यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषद घेत केला होता. यावर आता मा. राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या सगळ्याचे खंडन त्यांनी केले असून, तालुक्याचे विद्यमान आमदारांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आल्याचे सासवड येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत पुरंदरच्या जनेतेचे नुकसान झाले असा दावा देखील त्यांनी यावेळी बोलताना केला.
या विषयाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन संबधित विधानसभेच्या क्षेत्रातील प्रलंबित विषयांसाठी केले जाते. त्यावेळी संबधित विधानसभा क्षेत्राच्या आमदारांसह अधिकारीवर्गाला निमंत्रित करण्यात येत असते. यामुळे विद्यमान आमदारांना निमंत्रण मिळाले नाही, हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले. आमदार संजय जगताप यांनी केलेल्या आरोपांचे शिवतारे यांनी खंडन करीत पाच वर्ष तुम्ही काय केले असा सवाल केला. विधानसभेसारखे एवढे मोठे व्यासपीठ असताना मी मांडलेले विषय तुम्ही विधान सभेत लक्ष्यवेधी मांडून का मार्गी लावले नाहीत, असा सवाल उपस्थित केला. पुरंदरचे विमानतळाबाबत त्यांनी प्रथम मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविला होता. आता तेच म्हणतात की, पुरंदरमध्येच विमानतळ झाले पाहिजे. असा देखील शिवतारे यावेळी बोलताना म्हणाले.
तालुक्यातील अनेक विकास कामांवर सध्याच्या घडीला श्रेयवादाची लढाई पाहिला मिळत आहे. येत्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक लागणार आहे. आमदार संजय जगताप यांनी पुणे ग्रामीण आणि शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीला लोकांची पसंती मिळेल, असे सांगितले आहे. तसेच काँग्रेस पक्ष व इतर घटक पक्ष मिळून १७ ते १८ जागांवर विजयाची खात्री असल्याचे म्हटले आहे. मावळ, जुन्नर आणि खेड या तीन जागांवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवार देण्यात यावा, अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे करणार असल्याचे जाहीर केले आहे. मा. मंत्री विजय शिवतारे यांनी तालुक्यातून महायुतीकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, प्रत्येकाला तिकीट मागण्याचा नैतिक अधिकार आहे. पक्ष कोणाला संधी देतो हे पहावे लागेल. त्यामुळे कोणाच्याही नावावर शिक्का मोर्तेब झाला तरी, निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.