पुणेः येरवडा कारागृहातून कैद्यांचे पलायन होणे किंवा कैद्यांमध्ये आपापसात भांडण होऊन हाणामारी होण्याच्या अनेक घटना घडलेल्या असताना अशीच एका घटना दोन कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत संबंधित कैद्याच्या बरगडीला मोठी दुखापत झाली असून त्याच्या नाकातून रक्त आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सुधीर गौतम थोरात असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर कारागृहातील कैदी विकी उर्फ विवेक राजेश खराडे, अली अदम शेख यांनी सुधीरला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी कारागृहातील रक्षक विश्वास वाकडे (वय ४३) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील बराकीत १४ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कैदी सुधीर थोरात याला विकी खराडे, अली शेख यांनी अडवून कारागृहातून कधी सुटणार? अशी विचारणा केली. यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादाने भांडणाचे रुप धारण करीत खराडे आणि शेख यांनी थोरात याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
ही मारहाण इतकी जबरी स्वरुपाची होती की थोरातची बरगडी तसेच नाकाला मोठी दुखापत झाली. कारागृहात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी त्वरीत त्या ठिकाणी धाव घेतली. थोरातला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर प्रथमोपाचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेच्या निरीक्षक पल्लवी मेहेर यांनी कारागृहास भेट दिली. या प्रकरणाचा अधिकचा तपास सहायक निरीक्षक विशाल टकले हे करीत आहेत.