पुणेः शहरातील लष्कर भागात असणाऱ्या साऊथ इंडियन हॅाटेलमध्ये तीन उत्तप्यांची अॅानलाईन अॅार्डर एका ग्राहकाने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तीन उत्तप्यांन ऐवजी एकच उत्तप्पा ग्राहकाच्या घरी आला. यामुळे ग्राहकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याने संबंधित हॅाटेल मालकाविरोधात ग्राहकाने ग्राहक सेवा केंद्राचा दरवाजा ठोठावत त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. ही घटना ५ अॅागस्ट २०२२ रोजी घडली होती. दोन उत्तप्प्ये कमी दिल्याने ग्राहक आयोगाने हॅाटेल मालकाला ग्राहकास तब्बल दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिला आहे. या प्रकराची पुण्यात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पुण्याच्या लष्कर भागातील एका साऊथ इंडियन हॉटेल चालकाला तीन उत्तप्यांची ऑनलाइन ऑर्डर एका ग्राहकाने ५ अॅागस्ट २०२२ मध्ये दिली होती. ग्राहकाने तीन उत्तप्पे मागवले होते. मात्र, हॉटेलने एकच उत्तप्पे पाठवले. त्यातून झालेल्या मनस्तापातून ग्राहकाने थेट ग्राहक आयोगाचा दरवाजा ठोठावला. दोन्ही बाजू ऐकून ग्राहकाला त्रुटीयुक्त सेवा दिल्याने नुकसानभरपाई आणि दाव्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये देण्याचा आदेश आयोगाने उपाहार गृहचालकाला दिला आहे. केवळ एका चुकीमुळे हॅाटेल मालकाला दहा हजारांचा भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अरुण गायकवाड, सदस्या प्रणाली सावंत आणि कांचन गंगाधरे यांनी याबाबतचा निकाल दिला.
हॅाटेल चालकाने पैसे परत केले, पण..
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आई आणि पत्नी आजारी असल्याने त्यांनी 5 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी त्यांनी नाश्त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अॅपवरुन 3 कांदा उत्तपा आणि दोन (प्लेट) मेदूवडा सांबार मागवले होते. या अॅार्डरची रक्कम ग्राहकाने 389 रुपये जमा केले होते. हॅाटेलचालकाने केवळ एकच कांदा उत्तपा आणि दोन प्लेट मेदूवडा सांबार पाठवले. तक्रारदारांनी उपहारगृहात संपर्क साधून तक्रार दिली. उपाहारगृह व्यवस्थापनाने ही बाब मान्य केली, तसेच दोन प्लेट कांदा उत्तपाचे 158 रुपये परत केले होते.
…म्हणून हॅाटेल मालकाचा विनंती अर्ज फेटाळला
मात्र, तक्रारदाराची आजारी आई आणि पत्नीला वेळेत नाश्ता न मिळाल्यामुळे त्यांना औषध घेता आले नाही. त्यामुळे मागणीपेक्षा कमी खाद्य पदार्थांचा पुरवठा करत त्रुटीयुक्त सेवा दिल्याबद्दल नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारदाराने आयोगाकडे तक्रार दिली होती. या प्रकरणी संबंधित उपहारगृह चालकाने लेखी जबाब सादर केला होता. या लेखी जबाबात त्यांनी तक्रारदार यांचा दावा फेटाळण्याची विनंती केली होती. त्याबाबतचा कोणताही हॅाटेल मालकाने सादर न केल्याने या केसचा निकाल ग्राहकाच्या बाजूनला लागला आहे.