पुणेः ११ एप्रिल २०२० क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी स्थापन झालेल्या आणि समाजातील तळागाळातील गोरगरीबांच्या मुलांसाठी शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असणाऱ्या सोशल १०० फाउंडेशन या सेवाभावी संघटनेचा स्नेहमेळावा रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती. पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या ४ वर्षांपासून ही सेवाभावी संघटना पुणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिकतेची जाण आणि भान असणारे व संपूर्ण महाराष्ट्रातून संघटनेबरोबर जोडले गेलेले १४०० सहकारी मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. संघटनेबरोबर जोडले गेलेले सभासद दर महिन्याला १ ते ५ तारखेला संघटनेला १०० रुपये सामाजिक कृतज्ञता निधी म्हणून योगदान देत असतात. त्याच सामाजिक कृतज्ञता निधीच्या आधारे संघटना शिक्षणाची प्रचंड आस असणाऱ्या व गुणवत्ताही असणाऱ्या पण पैशाअभावी शिक्षण घेऊ न शकणाऱ्या गोरगरिब होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असते.
संघटनेचे शिष्यवृत्ती वाटपाचे हे ४ थे वर्ष असून गुणवत्ता व गरज हाच विद्यार्थी निवडीचा संघटनेचा निकष आहे. ह्यावर्षी संघटना उद्योजक, लेखक शरद तांदळे यांच्या हस्ते ८४ विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी १८ लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रेरणादायी वक्ते डॉ. दत्ताजी कोहीनकर हे मार्गदर्शन करणार असून निवृत्त न्यायाधीश आर. बी. चोरघे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत, असे संघटनेचे प्रवक्ते अनिल वाघ यांनी सांगितले.