कापूरहोळ: पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ येथील उड्डाणपुलाची साइट पट्टी कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे सेवा रस्तावर चिखल आणि माती आली असून, याचा वाहनचालकांना वाहन चालविताना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे उड्डाणपुलाचे पाणी साइट पट्टीमध्ये मुरत गेले आणि यामुळे साईट पट्टी कोसळली असल्याचे नागरिकांंकडून सांगण्यात येत आहे. तसेच काही नागरिकांनी उड्डाणपुलाचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे छोटी वाहने रस्त्यावरुन घसरत असून, अपघातांना आमंत्रण मिळत आहे. यामुळे वाहनचालकांना दुखापत होण्याची शक्यता वाढली आहे. असे असताना देखील रस्ता प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाहनचालक त्रस्त
या मार्गावरून रोज प्रवास करणारे वाहनचालक या घटनेमुळे खूप त्रस्त झाले आहेत. ते म्हणतात, “या रस्त्यावरून जाणे आता खूप धोकादायक झाले आहे. छोटी वाहने घसरत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने लवकरच या समस्येचे निराकरण करावे, अशी आमची मागणी आहे.”
माहिती मिळाल्यानंतरही कारवाई नाही
या घटनेची माहिती मिळाल्यानंतरही रस्ता प्राधिकरणाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली दिसत नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.
प्रशासनाने निर्णय घ्यावाः नागरिकांची मागणी
सदर उड्डाण पुलाचे काम हे चुकीच्या पद्धतीने व एकमेकांची मनधरणी करण्यासाठी करण्यात आलेले आहे. यामुळे या घटना घडत असून याचा वाहन धारकांना तसेच स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर लवकरात लवकर प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.