पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी वाहन शिकवणी चालकाने वाहन शिकण्यासाठी येत असलेल्या एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सादीक महंमद बिडीवाले रा. श्रावस्तीनगर, घोरपडी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे. याबाबत एका शाळकरी मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बिडीवाले हा घोरपडीतील श्रावस्तीनगर परिसरात खाजगी वाहन शिकवणी चालवतो. पीडित १५ वर्षीय मुलगी त्याच्याकडे वाहन शिकवणीला जात होती. महिनाभरापासून बिडीवाले पीडित मुलीशी अश्लील वर्तन करत होता.
चालक बिडीवालेने मुलीची परीक्षा घेण्याच्या बहाण्याने तिला शिकवणीत थांबविले. त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले असल्याची माहिती मुलीने पालकांना दिली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. चालकाविरुद्ध विनयभंग, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.