पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि बँकिंग कार्मिक निवड संस्था (आयबीपीएस) यांची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलनाला सुरुवात केले आहे. मंगळवारी रात्रीपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मात्र राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, असा आंदोलकांचा आरोप आहे. या आंदोलनकर्त्यांना खासदार सुप्रिया सुळे(supriya sule) यांनी भेट देत त्यांच्याशी संवाद साधत या प्रकरणी सरकावर ताशेरे ओढले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन स्थळी जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील सरकार हे फक्त खुर्चीवर प्रेम करणारे आहे. त्यांना ना विद्यार्थ्यांच्या समस्या समजतात, ना महिला अत्याचारांच्या घटनांचा कळवळा येतो. खुर्चीवर प्रेम करणारे हे सरकार असल्याची बोचरी टीका माध्यामांशी बोलताना खा. सुप्रिया सुळे यांनी केली.
तसेच आंदोलक विद्यार्थ्यांशी सुप्रिया सुळेंनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, इथून थेट मुंबईला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यासोबतच समाज माध्यमातूनही त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची माहिती देणार आहे. एमपीएससी आणि आयबीपीएसची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांनावर एका परीक्षेला मुकावे लागण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका खासदार सुळे यांनी घेतली आहे.