पुणे (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेसाठीचा प्रारुप आराखडा जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून तो येत्या १४ जुलै रोजी (सोमवार) प्रसिद्ध केला जाणार आहे. या नव्या आराखड्यानुसार, जिल्ह्यातील एकूण ७५ गटांऐवजी आता ७३ गट, तर १५० गणांऐवजी १४६ गण असणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांना प्रभाग रचनेचे अधिकार देण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. त्यानुसार १३ तालुक्यांतील तहसीलदारांनी आपापल्या तालुक्यांचा प्रारुप आराखडा सादर केला आहे.
प्रारुप आराखड्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यासाठी २१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या हरकतींवर २८ जुलैपर्यंत सुनावणी घेण्यात येणार असून त्यानंतर अंतिम निर्णयासाठी अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. १८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.
या नव्या रचनेत हवेली तालुक्यातील सात गट कमी करण्यात आले आहेत, तर जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यांत प्रत्येकी एका गटाची वाढ झाली आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांची माहिती, मतदारसंख्या, ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता व स्थिती यांचा आढावा घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आवश्यक त्या मतदान यंत्रांची उपलब्धता राज्य निवडणूक आयोगाकडून होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
१४ जुलैपासून प्रारुप प्रभाग रचना नागरिकांना निरीक्षणासाठी खुली करण्यात येणार असून, नागरिकांनी वेळेत आपले हरकती आणि सूचना सादर करून सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.