पुणेः जुलै महिन्यामध्ये बंद घरच्या दरवाज्याचे कुलुप तोडून घरातून सोने व चांदीच्या दागिन्यांची चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी प्रकरणातील अज्ञात चोरट्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. या गुन्ह्यातील आरोपी इंदापूर येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इंदापूरमधून आरोपीला ताब्यात घेतले असून, संतोष कुचेकर (वय १८ वर्षे तळजाई वसाहत, पदमावती, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले होते. त्यानुसार नमुद अंमलदार हे अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा आरोपी मुळ गाव बोरी, वालचंदनगर, इंदापुर येथे गेला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी बोरी, वालचंदनगर, इंदापुर येथे जाऊन आरोपीताचा शोध घेतला असता, तो मिळुन आल्याने त्यास पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून ७२ हजार रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.