पुणेः शहरातील नऱ्हे भागात पेट्रोल चोरी करण्याच्या संशयावरुन एका २० वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांकडून मा उपसरंपचांसह चौघांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना नऱ्हे भागातील मानाजीनगर भागात घडली होती. या घटनेत समर्थ नेताजी भगत (वय २० वर्ष रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॅालेज रोड नऱ्हे) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे भागातील मानाजीनगर भागात दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयाबाहेर समर्थ याच्या दुचाकीतून पेट्रोल संपले होते. यामुळे तो दुसऱ्या दुचाकीतील पेट्रोल काढत होता. हे करताना त्याला संजय कुटे व त्याच्या मित्रांनी पाहिले. पेट्रोल चोरी करत असल्याचे समजून समर्थला त्यांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की या घटनेत समर्थाला जीव गमवावा लागला.
या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी गौरव संजय कुटे वय २४ अजिंक्य चंद्रकांत गांडले वय २० सोमनाथ लोहार वय २३ सर्व राहणार मानाजीनगर नऱ्हे यांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित घटनेचे व्हिडिओ फुटेज पोलिसांना मिळाले असून, या प्रकरणातील मा. उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.