भोर: तालुक्यातील विविध भागात आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा गाव भेट दौरा सुरू असून, त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांनी हिरडस मावळ खोऱ्यातील गावांना भेटी देत येथील नागरिकांशी संवाद साधला. देवधर येथील ग्रामदैवत श्री रवळेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन त्यांनी या दौऱ्याला सुरूवात केली.
७२३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
या भागातून निगुडघरवरून महाडला जाणारा रस्ता, देवघर धरण, शिरगांव व देवघर येथे उभारण्यात आलेले सेल्फी पाँईन्ट यामुळे या भागात पर्यटनाच्या माध्यमातून छोटे-मोठे व्यवसाय व स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक वेळा पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे वरंधा घाटात दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे परिणामी वाहतूक सेवा बंद होत असते. यावर पाठपुरावा केले असल्याची माहिती त्यांनी दिली. महाड-पंढरपूर रस्त्याचे काँक्रिटिकारण करणे व अनेक ठिकाणी संरक्षण भिंती बांधणे या कामासाठी तब्ब्ल ७२३ कोटी रूपयांच्या निधीतून सुरु झाले असल्याचे सांगितले. यामुळे रस्ता वाहतुकीस उत्तम दर्जेदार होणार असून त्यामुळे प्रवाशी व नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणारः थोपटे
दुर्गम आणि डोंगरी भागातील शालेय विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी गैरसोय पाहता या भागातील तरुण व ग्रामस्थ यांनी केलेल्या मागणीनुसार रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून शिरवली हि. मा. येथे माध्यमिक विद्यालय उभारले आहे. त्यामुळे येथील मुलींना शिक्षणासाठी अधीक वाव मिळाला आहे. कोंढरी, धानवली व मुळशी तालुक्यातील घुटके या गावाचे पुनर्वसन तात्काळ व्हावे, यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या सोबत अनेक बैठका घेतल्या. विधानसभेच्या अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवला, त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री कार्यालयात असून, पुढील काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत हा प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.
लोखंडी शिडी बसण्याचे काम मार्गी
रायरी (धारांबे) येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी विशेष लक्ष घालून त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे. यानिमित्ताने शिवसृष्टी पाहून रायरी मार्गे रायरेश्वरला जाणारे पर्यटक, शिवप्रेमी व स्थानिक रहिवाशी यांना रायरेश्वर किल्ल्यावर येण्या-जाण्यासाठी लोखंडी शिडी बसवण्याचे काम मार्गी लावत असल्याची माहिती त्यांनी दिली.
हिरडस मावळ भागातील नागरिकांचे पाठबळ पाठीशीः थोपटेंचा विश्वास
तसेच माझेरी, परखंदेवाडी, करंजगाव, गोळेवाडी, म्हसर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी विशेष लक्ष घालून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत निधी उपलब्ध करून या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला. त्याचबरोबर अनेक गावात, वाडीवस्तीत पाणीपुरवठा योजना, सभामंडप, रस्ते काँक्रीटकरण, शाळा इमारत, स्मशानभूमी अशी अनेक विकास कामे मार्गी लावली. येणाऱ्या काळात या भागासह तालुक्याचा विकास अधिक गतीने करण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहे, त्यासाठी हिरडस मावळ भागातील सर्व नागरिकांचे सहकार्य, पाठबळ पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मानसिंग धुमाळ, रवींद्र बांदल, माऊली शिंदे, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, विठ्ठल आवाळे, हनुमंत कंक, आनंदा आंबवले, अनिल सावले, रामदास जेधे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.