भोरः येथील भोलावडे या गावात असणाऱ्या शाळेच्या मैदानावर भाजपचे किरण दगडे यांनी दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये दगडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रकाश गायकवाड नामक व्यक्तीने मा. मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटे आणि त्यांचे पुत्र पृथ्वीराज थोपटे यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली. या घटनेचे तीव्र पडसाद भोरमध्ये पाहिला मिळाले. त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी याचा जाहीर निषेध नोंदवित टीका करणाऱ्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरवर जोडो मारो आंदोलन करुन त्याचे दहन केले. भोर तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
यावेळी भोर-मुळशी-वेल्हा(राजगड) तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थन मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. पुणे-सातारा महामार्गावरील कापूरव्होळ या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यामुळे महार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आंंदोनलामुळे वाहनचालकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. अर्ध्या तासानंतर वाहतून पुन्हा सुरळीत करण्यात आली.
तब्बल अर्धा तास रोखून धरला महामार्ग, आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन केले स्थगित
यावेळी अटक करा…. अटक करा…. अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. आरोपींना जोपर्यंत अटक करणार नाही, तोपर्यंत रस्ता सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला होता. तब्बल अर्धा तास पुणे-सातारा महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता. संबंधितांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले. आंदोलनला कोणतेही हिंसक वळून लागू नये, म्हणून राजगड पोलीस स्टेशनच्या कर्मचारी यांचा पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
त्यावेळी भोर काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, वेल्हा अध्यक्ष नाना राऊत, पृथ्वीराज थोपटे, मुंबई बाजार समिती धनंजय वाडकर, युवक अध्यक्ष महेश टापरे, माजी सभापती लहू शेलार, माजी जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, राजगड संचालक उपाध्याक्ष पोपटराव सुके, किसनराव सोनवणे, दिनकरराव धरपाळे, तोसिफ आतार, विकास कोंडे, नितीन दामगुडे, रामचंद्र आवारे, समिर सागळे, माऊली पांगारे, महेश धाडवेपाटील, पंकज गाडेपाटील, गोरक्ष मानकर, चंद्रकांत मळेकर, महेश धाडवे, अमित सगळे, ईश्वर पांगारे, संगम पाचकाळे, रामचंद्र आवारे आदी उपस्थित होते.
भोर शहरातील दुकाने बंद
मा. मंत्री अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपेट आणि पुत्र पृथ्वीराज थोपटे यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांत टीका करण्यात आल्याने याचे पडसाद भोर शहरात उमटल्याचे पाहिला मिळाले. येथील दुकाने बेताल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदिवण्यासाठी व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती.
निवडणुकीच्या काळापुरतं लोकांना भुलवण्याचं काम सध्या सुरूः काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते
बेताल वक्तव्य करणाऱ्या किरण दगडे व त्यांचा कार्यकर्ता गायकवाड मामा की काका याचा आम्ही जाहीर निषेध करतो, ही भाजपची संस्कृती आहे. प्रकाश झोतात येण्यासाठी काही बेताल वक्तव्य ही मंडळी करत असतात. त्याने फराळ वाटावा किंवा अजून देवदर्शन यात्रा घडवून आणाव्या, याबद्दल आमचं कधीच दुमत नाही. परंतु, थोपटे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य भोर, वेल्हा, मुळशी या तीन तालुक्याच्या विकासाकरिता आणि कामाकरता घालवले आहे, किरण दगडे याला याची काहीच कल्पना नाही. कारण त्याचा जन्म ही त्यावेळेला नव्हता. ग्रामीण भागामधील अडचणी काय असतात, हे त्याला अद्याप माहित नाही. निवडणुकीच्या काळापुरतं लोकांना भुलवण्याचं काम सध्या सुरू आहे.
…तर तालुक्यात फिरू देणार नाही
मतांच्या राजकरणासाठी आमच्या जेष्ठ नेत्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले. भाजप समर्थकांनी जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ही पहिली आणि शेवटची चूक असेल, असे पुन्हा व्यक्तव्य केले. तर तालुक्यात फिरु देणार नाही.
तालुकाअध्यक्ष शैलेश सोनावणे
चार जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश गायकवाड, अमर बुदगुड, किरण दगडे, अज्ञात इसम (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.