शिरवळ : खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील अल्पवयीन मुलीने युवकाकडून वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी सांगवी ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत तपास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास अधिकारी शिरवळच्या पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी फलटण पोलिस उपअधीक्षकाना आदेश देण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील सांगवी येथील एका शाळकरी मुलीला ‘मला तू खूप आवडते,’ असे म्हणत तिचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी अक्षय लांडगे याच्यावर दि. २९ नोव्हेंबरला शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आपल्याविरुद्ध तक्रार दिल्याच्या रागातून दि. ३० नोव्हेंबरला संशयित अक्षय लांडगे व त्याच्या दोन मित्रांनी येऊन पीडित शाळकरी मुलीच्या आईचा हात पकडून विनयभंग केला. पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेतली नाही तर मुलीला उचलून नेईन, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली, असे शाळकरी मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले होते. या घटनेमुळे शाळकरी मुलगी घाबरलेल्या अवस्थेत शिर होती.
संशयित अक्षय दि. १४ डिसेंबरला जामिनावर सुटून बाहेर आला. त्यानंतर संशयित अक्षय हा मुलीच्या घराबाहेर दुचाकीवरून घिरट्या घालू लागल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी दि. १५ डिसेंबर रोजी तपासी अंमलदार यांना सर्व हकीकत सांगितली. अक्षय लांडगे हा शाळकरी मुलीच्या घरासमोरून जोरात गाडी चालवत गेला असल्याचे अल्पवयीन मुलगी व चुलल्याने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, या घटनेने मुलगी भेदरलेल्या अवस्थेत होती. कुटुंबीयांनी तिची समजूत काढून सर्वजण झोपी गेले असता मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. अक्षय पोपट लांडगे व त्याचे मित्र विकास भानुदास चव्हाण व निखिल यलाप्पा चव्हाण (सर्व रा. दत्तनगर, शिरवळ) यांना घाबरून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
नातेवाईक व ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह शव विच्छेदनानंतर पोलिस ठाण्यासमोर आणून जोपर्यंत संशयितास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही. अशी भूमिका घेतली. पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने नातेवाईक व ग्रामस्थ एकत्रित आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर अक्षय लांडगे यास ताब्यात घेतल्याचे सांगून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेहावर सांगवी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशीही सांगवी ग्रामस्थ व महिला यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून संशयित आरोपीस कडक शिक्षा करा व तपासी अंमलदार यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. शेवटी याची दखल घेऊन पोलिस अधीक्षक यांनी कारवाई केली आहे. याचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे